भारतामध्ये १९३६ ते १९४५ या दुसर्‍या महायुद्धाच्या काळात शारीरिक शिक्षण व मंडळाची स्थापना होऊ लागली. या संस्थांनी व मंडळीनी भारतीय व पाश्चिमात्य व्यायाम व क्रीडा प्रशिक्षणाचे शिक्षण देण्याचे काम केले त्याच बरोबर प्रचार व प्रसाराचेही मोठे काम केले. भारतीय खेळांना नियमबद्ध करण्याची कामगिरी केली. अशा पद्धतीने नियमन, नियंत्रण, प्रसार व प्रचार करण्यासाठी संस्था, संघटना उदयास आल्या. व्यक्तीच्या सामाजिक गरजांच्या पुर्ततेसाठी कोणत्याही समाजात क्रीडा गुणवत्ता वाढविण्यासाठी विभिन्न क्रीडा संघटनांची निर्मिती होत असते.

महाराष्ट्रात खो-खो खेळाची बांधणी पुण्याच्या डेक्कन जिमखान्याने केली. १९१४-१९१५ साली  डेक्कन जिमखान्याने या खेळाचे नियम बनविले आणि स्पर्धात्मक खो-खो ची वाटचाल सुरु झाली. १९२८ साली अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळ स्थापन झाले ज्यात पुण्याचे डॉ. आबासाहेब नातु, नाशिकचे महाबळ गुरुजी, मिरजचे कमलाकर वैद्य व मुंबईचे डॉ. मिरजकर यांनी प्रयत्नपूर्वक व अभ्यास करीत नियमांमध्ये सुसुत्रता आणली. सुरवातीच्या कालखंडात अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळ क्रीडा स्पर्धांचे एकहाती नियोजन करीत होती. आजही आपण खो-खो खेळ पाहतो त्यात आणि अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळ याने बनविलेल्या नियमांच्या गाभ्यात फारसा फरक नाही. अर्थात त्यावेळेस अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळांच्याहून वेगळ्या अशा दख्खन जिमखाना, पुणे व हिंद विजय जिमखाना, वडोदरा यांच्या स्वतंत्र नियम नियमावली सहित खेळ अस्तित्वात होता.

१९२३-२४ पासून आंतर शालेय स्पर्धेत खो-खो चा समावेश झाला. अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळ यांनी १९३३ साली खेळणार्‍या सर्व संस्थाकडून आवश्यक ते बदल मागवत सर्व ठिकाणी एकच असा सर्वकालिक नियम-नियमावली तयार केली. १९३५ साली त्यात महत्वाचे बदल घडत मैदान, गुण पद्धती व वेळेबाबत नियम तयार झाले.

१९४२ साली दिल्लीच्या बृह्नमहाराष्ट्र शारीरिक शिक्षण परिषदेने अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाला आपले सदस्य केले. त्यामुळे यानंतर भारतीय स्तरावर खो-खोच्या नियमांना मान्यता मिळाली. ह्यावेळेस या खेळातील नामवंत संघ म्हणून वडोदराचे जुम्मादादा व्यायामशाळा व हिंद विजय जिमखाना; पुण्याचे सन्मित्र संघ, आर्य क्रीडोधारक मंडळ तर मुंबईचे श्री समर्थ व्यायाम मंदिर, अमर हिंद मंडळ, लोकसेना, विद्युत व विजय क्लब या संस्था होत्या. या दरम्यान विभागीय व राज्यस्तरावर खो-खोच्या स्पर्धा होत असत.

खो-खोच्या क्षेत्रात देखील मुंबई राज्यापुरती खो-खो खेळाची संस्था स्थापन करावी म्हणून कै. भाई नेरुरकर, शांताराम भोईर, हरिश्चंद्र केणी, बा. गो. पाटणकर यांनी २३ फेब्रुवारी, १९५६ व १५ मार्च, १९५६ रोजी अशा दोन वेळा खो-खो खेळातील कार्यकर्त्यांची सभा भरवून मुंबई राज्य खो-खो असोसिएशनची स्थापना केली. १९६० साली मुंबई राज्याचे गुजरात व महाराष्ट्र असे दोन भाग स्वतंत्र्य राज्ये झाल्यामुळे दोन्ही राज्यांना स्वतंत्र्य असोसिएशन स्थापन करण्यात आली. मराठमोळा खेळ म्हणून खो-खोची महाराष्ट्रात एक प्रभावी संघटना उभारून त्याद्वारे या बहुगुणी खेळाला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनाचे एक अंग बनविण्यासाठी कै. भाई नेरुरकर, हरिश्चंद्र केणी, शांताराम भोईर इत्यादींनी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची स्थापना केली. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनला १९५७ पासूनची फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता मिळाली. १९५९ साली सरकारी शिक्षण खात्याची मान्यता, १९६० साली महाराष्ट्र स्टेट स्पोर्ट्स कौन्सिलची तर १९६२ पासून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची संलग्नता मिळाली.

२५ मार्च, १९६१ मध्ये शांताराम भोईर, हरिश्चंद्र केणी, भाई गावंड यांनी प्रथमच बनविलेल्या असोसिएशनच्या मानचिन्हास कार्यकारी मंडळाने मान्यता दिली. नंतर ते मानचिन्ह बदलण्यात आले.

 

logo01

१९६१ साली प्रथमच बनविलेले मानचिन्ह

logo02

सध्याचे मानचिन्ह

त्यानंतरच्या काळात एक खेळ एक संघटना या तत्वाचा बहुतांशी खेळांनी स्वीकार केला तरी महाराष्ट्रात १९६० ते १९६५ ह्या दरम्यान महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व महामंडळ अशा दोन संघटना समांतरकाम करू लागल्या. त्यात महामंडळाच्या बाजूने पालकसर (विजय क्लब), गोसावीसर (विद्यार्थी), पंतसर (चेंबूर क्रीडा मंडळ), हरीभाऊ साने (पुणे) व विदर्भातील काही मंडळी होती. तर महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या बाजूने युवक क्रीडा मंडळ, विद्युत व इतर अशा दोन फळ्यात कार्यकर्ते विभागले गेले. कालांतराने चर्चेअंती महामंडळ हे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनमध्ये विलीन झाले. त्याचबरोबर विदर्भासाठी वेगळी संघटना निर्माण होत एकूणच वितुष्ट संपले. आज महाराष्ट्रातून महाराष्ट्र, विदर्भ व कोल्हापूर अशा तीन संघटना भारतीय खो-खो फेडरेशनला संलग्न आहेत.

maharashtra_map

सुरवातीच्या काळात महाराष्ट्रात या खेळावर पुणे-मुंबईचाच पगडा होता. काही स्थानिक संघांना तर सुरवातीच्या काळात राज्य अजिंक्यपद स्पर्धेत थेट प्रवेशही मिळाला होता. आज तशी स्थिती राहिलेली नाही. आज महाराष्ट्र खो-खो असोसिएशनला २३ जिल्हे (पालघर २४ वा) संलग्न आहेत. ह्या २३ जिल्ह्यातील किमान डझनभर संघ आज स्पर्धा करण्याच्या इर्षेने स्पर्धेत उतरत असतात. आज पुरुषांमध्ये सांगली, मुंबई-पुण्यासहित मुंबई उपनगर, ठाणे असे संघ वर्चस्व राखून आहेत तर महिलांच्या संघामध्ये ठाणे, उस्मानाबाद, सातारा, मुंबई उपनगर, अहमदनगर, सांगली हे आज आघाडीवर खेळत आहेत.

१९६० ते १९६५ या काळामध्येच महाराष्ट्राने खो-खो जगाला सांख्यिकिचे महत्त्व पटवून दिले. खो-खो खेळाची आणि खेळाडूंच्या नैपुण्याची सांख्यिक नोंद ठेवण्याचे काम महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने प्रत्यक्षात १९६८ सालापासून सुरु केले. श्री. रमेश वरळीकर जेष्ठ सांख्यिकि तज्ञ म्हणतात भारतीय खो-खो क्षेत्रात महाराष्ट्र खो खो असोसिएशन हीच एकमेव राज्य संघटना आहे कि जिने खो-खो मध्ये सांख्यिकीची उपयुक्तता आणि महत्त्व जाणून प्रत्यक्षात आणले.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशन मार्फत तीन वयोगटांच्या पुरुष व महिला अशा राज्य अजिंक्यपद स्पर्धा होतात. १९८८-१९८९ पासून श्री. चंद्रकांत पडवळ यांच्या महापौरपदाच्या कार्यकाळापासून महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या पाठपुराव्यामुळे व्यवसायिक गटांची (पुरुष) मुंबई महापौर चषक खो खो स्पर्धा सुरु झाली.

दिवंगत भाई नेरुरकर यांच्या कुशल नेतृत्वाने राष्ट्रीय फेडरेशनच्या स्थापनेनंतर योग्य दिशा व गती मिळाली. त्याच बरोबर खो-खोला राष्ट्रव्यापी स्वरूप मिळाले. १९७५ नंतर कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, तेलंगना, पंजाब, पॉडेचेरी, केरळ इ. राज्यात स्पर्धात्मक चुरस वाढली. महाराष्ट्रात व भारतात ज्यांनी खो-खो च्या संघटनात्मक कार्याची ध्वजा रोवली त्या दिवंगत भाई नेरुरकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने १९६३ साली अति दर्जेदार अशी राष्ट्रीय स्तरावरील भाई नेरुरकर सुवर्णचषक अखिल भारतीय स्पर्धा सुरु केली.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष नामदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सर्वांगीण प्रयत्नामुळे खो-खो हा खेळ आशियाई पातळीवर पोहोचला.

खो-खो खेळ वाढविण्याचे ध्येय समोर ठेवून महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे मागील पन्नास वर्षापासून खो-खो चा प्रसार व प्रचार करण्यासाठी अविरत काम सुरु आहे. आज महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. अजितदादा पवार हे असून त्यांच्या आशीर्वादाखाली व डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या सरचिटणीस पदाच्या नेतृत्वाखाली संघटनेची घौडदौड जोरात चालू आहे.

एकुणच खो-खोतील महत्वाच्या घटनांचा उल्लेख करायचे तर ……..

खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाने १९५९-६० साली पुरुष गटाची पहिली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा विजयवाडा येथे भरविली. तेव्हाचे मुंबई राज्याने सदर स्पर्धा जिंकलेल्या संघाचे नेतृत्व श्री. राजाभाऊ जेस्ते यांनी केले. १९६०-६१ साली महिला गटाची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा भरविण्यास सुरवात झाली. ज्यावेळेपासून एकलव्य पुरस्कार व राणी लक्ष्मीबाई पुरस्कार अष्टपैलू खेळाडूंना देण्यास सुरवात झाली.

१९६९-७० पासून कुमार / मुलींच्या गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेस सुरवात झाली ज्यात कुमारांना १८ वर्षाखालील तर मुलींना १६ वर्षाखालील असा वयोगट होता. या स्पर्धेपासून या गटातील अष्टपैलूंना ‘वीर अभिमन्यु’ पुरस्कार व ‘जानकी’ पुरस्कार खेळाडूंना देऊन गौरविण्यास सुरवात झाली.

तर १९७४ सालापासून देवास येथे किशोर व किशोरी गटांची पहिल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेस सुरवात झाली. ज्यात कुमारांना १४ वर्षाखालील तर मुलींना १२ वर्षाखालील असा वयोगट होता. या स्पर्धेपासून या गटातील अष्टपैलू खेळाडूंना ‘भरत’ पुरस्कार व ‘वीरबाला’ पुरस्कार देऊन गौरविण्यास सुरवात झाली. कालांतराने वीरबाला पुरस्काराचे नामांतर ‘इला’ पुरस्कार यात झाले.

१९८२ पासून फेडरेशन कप खो-खो सुरवात झाली. श्री. काशिनाथ उर्फ भाई नेरुरकर यांच्या अचानक स्वर्गवासानंतर खो-खो खेळाला गती मिळावी म्हणून त्यांच्या स्मरणार्थ कै. भाई नेरुरकर सुवर्ण चषक खो-खो स्पर्धेस सुरवात झाली. हि स्पर्धा प्रायोजकांच्या उदासीनतेमुळे संघटनेस कधीच नियमितपणे घेता आली नाही.

१९७० साली भारत सरकारचा खो खोतील पहिला अर्जुन पुरस्कार श्री. सुधीर परब यांना मिळाला.