खो खो या खेळाचा इतिहास

खो खो या खेळाचा उगम महाराष्ट्राच्या या मातीतच खर्‍या अर्थाने झाला. ज्येष्ठ सांख्यिकीतज्ञ श्री. रमेश वरळीकर यांच्या “खो-खो” या पुस्तकात मांडलेल्या खालील तर्क पटण्यालायक वाटतो. आपला देश हा शेतीप्रधान भारतीय संस्कृतीचा अविष्कार आहे. पिकांनी भरलेली शेती जनावरांनी खराब करू नये म्हणून जे विविध उपाय योजले जात असत त्यापैकी त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करून त्यांना पळवून लावणे हा प्रमुख उपाय असे. त्यासाठी शेतात काही ठराविक अंतरावर लहान मुले एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून बसवून त्यांना कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज (भो भो) करायला सांगितले जात असावे. असे या शेत (क्षेत्र) रक्षणवृत्तीतून लहान मुलांचा खो-खो खेळ-पळती /पाठलागाचा सुरु झाला असावा.

काही जाणकारांच्या मते महाभारत काळात देखील खो घालणे किंवा खो देणे या अर्थाचे शब्द प्रयोग आढळतात आणि त्यामुळे खो-खो हा प्राचीन भारतीय खेळ असावा. महाभारतात कर्णाचा साथीदार शल्य उत्तम अश्वचालक होता. तसेच कृष्णही उत्तम अश्वचालक होता. युद्धात रथांच्या सहाय्याने भेदला जाणारा रथोद नावाचा व्युह असो व तो भेदण्यासाठी चाल असो यात दोघेही आपले रथ एकेरी साखळी पद्धतीने टाकत पुढे मार्ग काढत जायचे. अभिमन्यु जेव्हा कौरवांचे चक्रव्यूह भेदत आत शिरला ते तंत्र गोलातला खेळ तोडणे ह्या तंत्राशी साधर्म्य दाखवते. मात्र एवढ्याश्या उदाहरणावरून खो-खो ची उत्पत्ती महाभारत काळापासून झाली असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

संतश्रेष्ठ तुकारामांच्या व संत एकनाथांच्याअभंगात याखेळाचा उल्लेख असल्याचेही सांगितले जाते.

मागे पुढे पाहे सांभाळुनी दोनी ठाय
चुकावूनि जाय गडी राखे गडीयांसी।
मुरडे दंडा दोन्ही तोंडे गडियां सावध करी
भेटलिया संगे तया हाल तुजवरी।।
– संतश्रेष्ठ तुकाराम

हमामा हुंबरी खेळती एक मेळा
नाना परींचे गोपाळ मिळती सकळा।
अ॓क धावे पुढे दुजा धावे पाठी
अ॓क पळे अ॓कापुढे अ॓क सांडोनी आठी।।
– संत एकनाथ

खो-खो हा खेळ महाराष्ट्रात मागील किती वर्षांपासून खेळला जातो याची माहिती पुराव्यानिशी उपलब्ध नाहीत. परंतु तो बराच जुना आहे यात काही शंका नाही पूर्वीच्या खेळामध्ये नियम किंवा शिस्त नव्हती त्यामुळे त्यास शिवाशिव किंवा धांगड -धींग्याचे स्वरूप मिळाले होते. सभासदांच्या बखरीत राजाराम महाराजांच्या वेळी खो शब्द सापडतो पण त्यावेळी हा खेळ खेळला जात होता किंवा काय याची माहिती मिळत नाही पण हा खेळ प्रामुख्याने मराठी मुलाखातीलच आहे. बडोदा हे खो-खो चे माहेर होय. त्यानंतर पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, धुळे या मराठी माणसांच्या वस्तीत मात्र खो-खो गेली पाऊणशे ते शंभर वर्षाच्या काळात खेळला गेल्याचा उल्लेख आढळतो.

या सर्वातून एक प्रतीत होते ते म्हणजे या खेळाचा नक्की उगम कुठे झाला ह्याचा कुठेही निश्चित स्थान नाही. मात्र ह्या खेळाला सुत्रबद्धता आणत नियमांच्या आधारे याला अधिक परिपूर्ण करण्यात महाराष्ट्र आघाडीवर होता.

२० व्या शतकात खर्‍या अर्थाने खो-खो चा नियमबद्ध असा खेळ सुरु झाला. खो-खो हा मातीत खेळला जाणारा खेळ असून फक्त प्रायोगिक स्तरावर म्हणून लाकडी मैदानावर (Wooden Court) कोलकाता येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या वेळी (आशियाई स्पर्धा खेळला गेला आहे.)

अनेक दिग्गज खो-खो प्रेमींच्या अथक प्रयत्नातुनच हा खेळ काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत व त्रिपुरापासूनगुजरात पर्यंत सर्व राज्यात हा खेळ खेळला जात आहे. आज भारतात विविध स्तरांवर दरवर्षी खो-खो स्पर्धा होत असतात. शालेय, महाविद्यालयीन, विद्यापीठ तसेच छोट्या-मोठयागटांच्या स्पर्धांचे जाळे भारतभर पसरले आहे. प्रतिवर्षी होणार्‍या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेतील विविध गटांतून मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेतला तर हा गतिमान खेळ विद्यार्थी वर्गाचे एक प्रमुख आकर्षण बनला आहे.

खो-खो

खो या शब्दाचा अर्थ हुलकावणी देणे, चकविणे असा होतो. खो-खो वर खेळाची उभारणी हि अगदी अशीच करण्यात आलेली आहे.

खो-खोचा खेळ नैसर्गिकपणे वास करणार्‍या वृत्तींची जोपासना करणार्‍या त्या वृद्धिंगत करणारा, संपूर्ण शरीराला व्यायाम देणारा असा खेळ आहे. खो-खो खेळ म्हणजे केवळ पळापळी किंवा पाठशिवणी नव्हे तर मनुष्य मात्रात सुप्तपणे वावरणार्‍या शिकार साधण्याच्या ईच्छेचा तो एक सभ्य अविष्कार आहे. पळून जाणारे भक्ष व त्याहून अधिक वेगाने पळून आपल्या कब्जात आणणे हा सृष्टीचा नियम येथे प्रत्यही जाणवतो. त्यामुळे वेग हे या खेळाचे प्रमुख लक्षण आहे पण वेगाबरोबरच या खेळासाठी ताकद, जोम, उत्साह, बुद्धीचातुर्य, क्षमता, चपळता, आक्रमकता, बचाव, अचूक निर्णय क्षमता असणे आवश्यक आहे. खो-खो हा खेळ एक वेगवान व थरार निर्माण करणारा असून शिगेला पोहोचवणारी उत्सुकता निर्माण करणारा खेळ आहे.

खो-खो खेळामुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत होते कारण हा खेळ खेळताना शरीराच्या सर्व भागांचा समावेश होतो. त्यामुळे हा खेळ शरीरासाठी उत्तम व्यायाम आहे.

तसेच खो-खो खेळाने सामाजिक एकोपा, अखंडत्व वाढीस लागते. खेळाडूंमध्ये नेतृत्वगुण, खिलाडीवृत्ती, संघ भावना वाढीस लागते.

ज्येष्ठ सांख्यिकीतज्ञ श्री. रमेश वरळीकर म्हणतात कि खो-खो एक आकर्षक एक गतिमान खेळ भारतात आता चांगलाच लोकप्रिय ठरला आहे. वेळेबरोबर धावणारा गुणफलक हा या खेळाचा गाभा आहे.

गती, कस आणि कौशल्य यांचा त्रिवेणी संगम ज्या खेळात आहे असा हा खेळ खो-खो जोरदार पाठलाग आणि तितकीच चपळ हुलकावणी यांची अपूर्व झुंज म्हणजे खो-खो “पायात कोणत्याही प्रकारचे बूट न घालता खेळला जाणारा गतिमान खेळ म्हणून खो-खो पूर्ण भारतात परिचित आहे”.