४ थ्या आशियाई अजिंक्यपद खो खो स्पर्धेत भारताचे दोन्ही संघ विजयी
दि. २० ते २३ मार्च, २०२३ पासून ४ थी आशियाई अजिंक्यपद खो खो स्पर्धा – २०२३ तामुलपूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, गुवाहाटी आसाम येथे आयोजित करण्यात आलेली होती.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने नेपाळ संघावर ३८-३२ असा १ डाव व ६ गुणांनी विजय संपादन केला तर महिला संघाने प्रतिस्पर्धी नेपाळ संघावर ४९-१६ असा १ डाव व ३३ गुणांनी एकतर्फी विजय संपादन केला. स्पर्धेतील तृतीय स्थान पुरुषांमध्ये श्रीलंका संघास तर महिलांमध्ये तृतीय स्थान बांगलादेश यांनी प्राप्त केले.
या स्पर्धेत भारतीय संघात महाराष्ट्रातील खेळाडूंची निवड करण्यात आली होती. पुरुष संघात अक्षय भांगरे, सुयश गरगटे व अनिकेत पोटे तर महिला संघात प्रियंका इंगळे, गौरी शिंदे व अपेक्षा सुतार यांची निवड झाली होती.
भारतीय खो खो संघातर्फे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव श्री. गोविंद शर्मा यांची स्पर्धेच्या निवड समिती सदस्य म्हणून निवड झाली तर डॉ. चंद्रजीत जाधव व श्री. सचिन गोडबोले यांची स्पर्धेच्या तांत्रिक समितीवर निवड करण्यात आली होती. तसेच स्पर्धा पंच प्रमुख म्हणून श्री. प्रशांत पाटणकर तर पंच म्हणून श्री. नानासाहेब झांबरे यांची निवड करण्यात आलेली होती.
या ४ थ्या आशियाई खो खो स्पर्धेत भारतासह नेपाळ, भूतान, बांगलादेश, मलेशिया, इराण, दक्षिण कोरिया, श्रीलंका व इंडोनेशिया असे नऊ देश सहभागी झालेले होते.